*मुंबईत ‘अखिल भारतीय डॉ. आंबेडकरी साहित्य संमेलन २०२६’चे आयोजन*
*मुंबईत ‘अखिल भारतीय डॉ. आंबेडकरी साहित्य संमेलन २०२६’चे आयोजन*
मुंबई, दि. ४ एप्रिल २०२६ —
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि आंबेडकरी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा गौरव करण्यासाठी ‘अखिल भारतीय डॉ. आंबेडकरी साहित्य संमेलन २०२६’चे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. हे संमेलन डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, वडाळा येथे पार पडणार आहे.
या संमेलनात देशभरातील विद्वान, अभ्यासक, लेखक आणि विचारवंत सहभागी होणार असून, आधुनिक भारताच्या घडणीत डॉ. आंबेडकर यांच्या योगदानावर सखोल चर्चा होणार आहे. सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत उद्घाटन सत्र होणार असून, त्यानंतर विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.
संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. देवीदास घोडेस्वार यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी डॉ. एस. के. गजभिये असतील. तसेच अनेक मान्यवर विद्वान व विचारवंत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
संमेलनाच्या माध्यमातून आंबेडकरी साहित्य, विचार आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे
संमेलनातील प्रमुख सत्रांमध्ये “भारतातील प्राचीन वित्त व्यवस्थेची उकल”, “डॉ. बाबासाहेबांचे प्रजासत्ताक लोकशाही आणि संविधानिक नैतिकता”, तसेच “राज्य समाजवाद आणि आर्थिक धोरणे” या विषयांवर चर्चासत्रांचा समावेश आहे. यामध्ये नामवंत प्राध्यापक, संशोधक आणि कायदेतज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
दुपारनंतर समारोप सत्र पार पडणार असून, यावेळी आंबेडकरी साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी गौरव पुरस्कार आणि सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच ‘आभार प्रदर्शन’ कार्यक्रमाने संमेलनाची सांगता होणार आहे.
या संमेलनाचे आयोजन व्हॉईस ऑफ इंजिनिअर्स पीपल फोरम, जस्टिस अँड पीस (VIPJP) आणि ऑल इंडिया एससी/एसटी कल्याणकारी कर्मचारी संस्था, ओएनजीसी , दौलतराव गुलाजी जाधव ट्रस्ट, आंबेडकराइट हिस्ट्री असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
आंबेडकरी विचारसरणीला बळकटी देणारे आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना अधोरेखित करणारे हे संमेलन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
डॉ संदेश वाघ, डॉ अनघा कांबळे, ऍड गजानन लासुरे हे कार्यक्रम समन्वयक आहेत . ऍड किशोर कांबळे आणि इतर मान्यवर कार्यक्रम आयोजक आहेत.
Comments
Post a Comment