घाटकोपर येथे टिळकमार्ग महानगरपालिका शाळा संकुलाचे महापौरांच्या हस्ते झाले लोकार्पण गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण
घाटकोपर येथे टिळकमार्ग महानगरपालिका शाळा संकुलाचे महापौरांच्या हस्ते झाले लोकार्पण गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण
मुंबई :बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एन' विभागांतर्गत घाटकोपर पूर्व येथील टिळकमार्ग येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक शालेय इमारत संकुलाचे लोकार्पण मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि स्थानिक आमदार पराग शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या नवीन तळ अधिक सहा मजली सुसज्ज इमारतीमुळे परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे. या कार्यक्रमादरम्यान स्थानिक आमदार पराग शाह यांनी शाळा संकुलाच्या विविध उपयोगांसाठी वैयक्तिक पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली, तसेच संकुलात स्वच्छता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखण्यावर विशेष भर दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
लोकार्पणप्रसंगी बोलताना महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, महपालिकेच्या शाळांमधून घडलेले अनेक विद्यार्थी आज जगभरात नाव उज्ज्वल करत असून स्वतः महापौर आणि शिक्षण उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर या महापालिका शाळेच्याच माजी विद्यार्थिनी आहेत. विद्यार्थ्यांना 'इस्रो' सारख्या संशोधन संस्थांना भेटी देण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तसेच विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू विनामूल्य दिल्या जात असून विज्ञान व गणिताची गोडी लागावी म्हणून 'सायन्स सोमवार' आणि 'गणित गुरुवार' सारखे उपक्रम राबवले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. नव्याने उभारलेल्या या सहा मजली भव्य इमारतीत ३८ वर्गखोल्या, २५ लहान खोल्या, १ मोठे सभागृह आणि १४ इतर सुविधा खोल्यांचा समावेश आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगणक लॅब, विज्ञान व खगोलशास्त्र प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, व्हअल क्लासरूम आणि सायकोलॉजिकल थेरपी लॅब यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सुविधेचा फायदा कामराज नगर, रमाबाई नगर, राजावाडी, छेडा नगर, विक्रोळी, चेंबूर व लगतच्या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना होणार आहे.
या सोहळ्यास नगरसेविका राखी जाधव, अर्चना भालेराव, नगरसेवक धर्मेश गिरी, उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर,सहायक आयुक्त जयदीप मोरे, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी सायली सुर्वे, अधीक्षक नंदु नाना घारे, अधीक्षक तथा प्रशासकीय अधिकारी (शाळा ) वीणा सोनवणे, प्रभारी विभाग निरीक्षक मीरा शर्मा, पर्यवेक्षक स्काऊट बिरप्पा पुजारी, पर्यवेक्षक गाईड सीमा आबनावे, इमारत प्रमुख तथा मुख्याध्यापिका आशा शर्मा आणि सर्व मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment