गुढीपाडवा आणि चैत्रगौरी : परंपरा श्रद्धा आणि माहेरपणाचा सण

गुढीपाडवा आणि चैत्रगौरी : परंपरा श्रद्धा आणि माहेरपणाचा सण
 
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि गुढीपाडव्याच्या मंगल पर्वाने घराघरांत उत्साह, आनंद आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण होते. गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा प्रारंभ नसून विजय, यश, समृद्धी आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो. पुराणांनुसार ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती याच दिवशी सुरू केली, तर इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या विजयाशीही या दिवसाची सांगड घातली जाते. म्हणूनच घरावर उभारली जाणारी गुढी ही विजय आणि अभिमानाचे प्रतीक मानली जाते.
गुढीपाडव्याबरोबरच चैत्र महिन्यात चैत्रगौरी पूजनालाही विशेष महत्त्व आहे. चैत्र मासातील शुक्ल पक्षातील तृतीयेला गौरीची स्थापना केली जाते. या दिवशी गौरी माहेरी येते, अशी सुंदर समजूत आहे. म्हणूनच हा सोहळा केवळ धार्मिक विधी नसून मुलगी माहेरी येण्याचा जिव्हाळा, माया आणि आपुलकी जपणारा सण आहे.
चैत्रगौरीची स्थापना लहानशा पाळण्यात किंवा सुंदर मांडवात केली जाते. तिच्याभोवती फळे, फराळ, गोडधोड, खिरापत आणि विविध नैवेद्य मांडले जातात. घर सजवले जाते, रांगोळी काढली जाते आणि देवीची मनोभावे पूजा केली जाते. गौरीची पूजा अक्षयतृतीयेपर्यंत केली जाते. या काळात सुवासिनींना बोलावून हळदी-कुंकू समारंभ केला जातो. त्यांना कैरीची डाळ, पन्हे, खिरापत दिली जाते आणि ओटी भरली जाते. या परंपरेतून स्त्रियांमधील स्नेह, आपुलकी आणि सांस्कृतिक एकोपा अधिक दृढ होतो.
माझ्यासाठी चैत्रगौरी हा सण लहानपणीच्या गोड आठवणींशी जोडलेला आहे. माझ्या आईच्या घरी आम्ही लहानपणी गुढीपाडव्याला गौरी बसवायचो. रोज तिची अंघोळ घालून पूजा करायचो. अक्षयतृतीयेच्या दिवशी हळदी-कुंकू करून सुवासिनींना बोलावलं जायचं. हरभऱ्याची डाळ, कैरीचा नैवेद्य आणि गौरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ बनवला जायचा. आमची परिस्थिती बेताचीच होती; तरीही माझी आई थोडं-थोडकं का होईना, पण मनापासून सगळं करायची. आज आम्ही तिघी बहिणी संसारात रमलो असलो, तरी अजूनही आई त्याच उत्साहाने चैत्रगौरीचा सोहळा साजरा करते. तिच्या त्या जपलेल्या परंपरेत मला माहेरपणाची ऊब, आईच्या हातचं प्रेम आणि संस्कारांची श्रीमंती दिसते.
गुढीपाडवा हा नववर्षाचा उत्साह देणारा सण आहे, तर चैत्रगौरी हा माहेरपण, माया, सौभाग्य आणि स्त्रीशक्तीचा भावपूर्ण उत्सव आहे. या दोन्ही सणांमधून आपल्या संस्कृतीतील प्रेम, परंपरा आणि कुटुंबबंध यांचे सुंदर दर्शन घडते.
लेखिका – प्रा. प्रज्ञा सचिन खरे, ग्रंथपाल

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*